कृषीमहाराष्ट्र

राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

देशात बंगालचा उपसागर, आंध्र प्रदेश, ओडिशालगतच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासह अरबी समुद्रातील हवामान बदलामुळे पुढील चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला. १३ सप्टेंबर रोजी संपूर्ण कोकणाला अलर्ट दिला आहे. तर विदर्भासह मध्य महाराष्ट्रातदेखील जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल, अशीही शक्यता वर्तवली आहे. यामुळे सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

याच काळात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ताशी ५५ किमी वेगाने वारे वाहतील. अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे. परिणामी, मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. हवामानात झालेल्या बदलामुळे पुढील आठवडाभर राज्यात मान्सूनचा मारा कायम राहील, असा अंदाज आहे.

कमी दाबाच्या क्षेत्रासह हवामानात होणाऱ्या बदलांमुळे परतीच्या मान्सूनचा प्रवास यंदा उशिराने सुरू होईल. दरवर्षी १५ सप्टेंबरच्या आसपास मान्सून राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू करतो. मात्र यंदा त्यास १५ दिवसांच्या विलंबाची शक्यता आहे. शनिवारी दुपारसह सायंकाळी व रात्री मुसळधार पावसाने मुंबईकरांना अक्षरश: झोडपून काढले. २४ तासांत कोकण, गोव्यात जोरदार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. येण्याऱ्या काही दिवसात पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे.