महाराष्ट्रराजकारण

‘तुमचा झंझावात आम्ही आजही पाहतोय’;रोहित पवारांनी आजोबांबाबत व्यक्त केल्या भावना

महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील राजकारणातील एक मोठे नाव ते म्हणजे शरद पवार. राज्यात किल्लारीचा भूकंप असो, गुजरातचा भूकंप असो किंवा मुंबईतील बॉम्बस्फोट असो.. अशा प्रत्येक संकटाच्या वेळी शरद पवार साहेबांनी निर्णायक भूमिका पार पाडली आहे. म्हणून तर केंद्रात सरकार कोणाचंही असो प्रत्येक संकटात त्या-त्या सरकारनेही साहेबांची मदत घेतली आहे. मार्गदर्शन घेतलं आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न असो की उद्योजकांचे.. कामगार, मजूर, महिला, व्यापारी, व्यावसायिक असे सर्वांचेच प्रश्न सोडवण्यासाठी साहेबांनी नेहमी पुढाकार घेतला. किंबहुना या सर्वच घटकांना साहेबांचा नेहमी आधार वाटत आला आहे. म्हणून तर साहेबांच्या भोवती सतत लोकांची गर्दी पाहायला मिळते, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रोहित पवार यांनी सांगितलं की, आज देशात अनंत अडचणी आहेत. विरोधी पक्षाकडून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले जात आहेत आणि यापुढंही मांडले जातील. पण ते सोडवण्यासाठी सत्ताधाऱ्यांवर दबावही निर्माण करावा लागतो. असा दबाव निर्माण करण्यासाठी विरोधकांना एकत्रित आणून एक मोठी ताकद उभी करण्याची आपली क्षमता आहे.

विरोधी पक्षातील आश्वासक नेता म्हणून आपल्याकडं पाहिलं जातं आहे. म्हणून विरोधकांची एकत्रित मोट बांधण्यासाठी प्रमुख भूमिका आपण घेऊ शकता आणि आज त्याचीच सर्वाधिक गरज आहे. अशा प्रकारे मोट बांधूनच आपण प्रबळ सत्ताधाऱ्यांशी लढू शकतो, असं एक कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्याला वाटतं, असेही रोहित पवारांनी म्हटले आहे.