बातमीराजकारण

कंगनाला महाराष्ट्राचे गृहमंत्री धमकी देतात हे आम्ही खपवून घेणार नाही- किरीट सोमय्या

गृहमंत्री अनिल देशमुख कंगना रणावतला धमकी देत आहेत, हे आम्ही चालू देणार नाही, असे भाजप प्रवक्ते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रत्येक मुंबईकर तिच्या या वक्तव्याशी असहमत आहेत. त्यामुळे कंगनाने तिचे वक्तव्य  मागे घ्यायलाच हवे, मात्र महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तिला धमकावणे हे आपण चालू देणार नाही, असे किरीट सोमय्या म्हणाले.

राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाची प्रकरणे तसेच या परिस्थितीशी लढण्यासाठी बेडची उपलब्धता आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांबाबतच्या महत्वाच्या विषयांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचाही आरोप यावेळी सोमय्या यांनी केला आहे.

कंगना रणावतने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची धमकी दिली असून मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे अशी टीका केली होती.

गृहमंत्री अनिल देशमुख कंगनाच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हणाले होते की, मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डशी होत असते. अतिशय सक्षमपणे मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस काम करत असतात. अशा परिस्थितीत एखाद्या कलाकाराने अशा प्रकारचे वक्तव्य करणे हास्यास्पद आहे. आज मुंबई तसेच महाराष्ट्र पोलिसांच्या हाती मुंबईत सुरक्षित आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीही ते सक्षम आहेत.