कोरोनामहाराष्ट्र

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा; लस येईपर्यंत कोरोनाचं संकट होणार गंभीर

जगभरात कोरोनाचं संकट आणखी गहिरं होताना दिसत आहे. काही देश या व्हायरसचा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सामना करत आहेत. पण, अमेरिका, ब्राझील आणि भारतात परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. त्यामुळं सगळ्यांचे डोळे कोरोनावरील लसीकडं लागले आहेत. मेडिकल सायन्स क्षेत्रातील शास्त्रज्ञ रात्रीचा दिवस करून कोरोनावरील लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.

ही लस येऊ पर्यंत जगात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलीय. जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कोरोनावरील लस उपलब्ध होऊपर्यंत हा व्हायरस 20 लाख लोकांचा बळी घेऊ शकतो. हा गंभीर आकडा टाळण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करण्याची गरज असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन विभागाचे संचालक मायकेल रेयान यांनी म्हटले आहे की, 10 लाख बळी हाच आकडा गंभीर आहे. आपण, आणखी दहा लाख जणांचा बळी जाण्याआधी योग्य पावले उचलली पाहिजेत. आम्ही हा आकडा टाळण्यासाठी एकत्रित प्रयत्न सुरू केले आहेत. आपण, या उपाययोजना केल्या नाहीत तर, दुदैवानं बळींचा आकडा निश्चित मोठा असेल. संभाव्य बळींचा आकडा की काही केवळ कल्पनेतील आकडा नाही तर दुर्दैवानं तेवढे बळी जाऊ शकतात.